
मुखपृष्ठ: अनिल अवचट
इतिवृत्त
मराठी अभ्यास परिषदेची २००७-२००८ या आर्थिक वर्षाची बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा दि० २२ जून २००८ रोजी सायंकाळी ५ वाजता भारत इतिहास संशोधन मंडळाचे सभागृह, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित केली होती. गणसंख्येअभावी सभा १५ मिनिटे स्थगित होऊन ठीक ५.१५ वाजता सुरू झाली. सभेचे अध्यक्ष प्रा० प्र०ना० परांजपे हे होते.
सभेच्या प्रारंभी २००७-२००८ या वर्षात दिवंगत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यवाह डॉ० नीलिमा गुंडी यांनी या सभेस अनुपस्थित राहण्याची पूर्वसूचना दिलेल्या सर्व सभासदांची नावे वाचून दाखवली आणि काही उपयुक्त सूचना करणार्या सभासदांचे आभार मानले.
त्यानंतर सभेचे विषयपत्रिकेनुसार कामकाज सुरू झाले. यात प्रथम २००७-२००८ या वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. या ठरावाची सूचना डॉ० कल्याण काळे यांनी केली तर या सूचनेला श्री० श्रीधर देशपांडे यांनी अनुमोदन दिले.
दुसर्या ठरावानुसार परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या कार्यवृत्ताचे वाचन करण्यात आले. या कार्यवृत्ताला मान्यता देण्याची सूचना डॉ० अंजली सोमण यांनी मांडली तर अनुमोदन श्री० ल०ना० गोखले यांनी दिले.
कोषाध्यक्ष विजया चौधरी यांनी २००७-२००८ च्या लेखापरीक्षण-अहवालाचे वाचन केले आणि त्याचबरोबर २००८-२००९ या वर्षासाठीचे अंदाजपत्रक सादर केले. या दोन्हींना अनुमोदन देण्याची सूचना श्री० अरविंद नवरे यांनी मांडली तर अनुमोदन श्री० विजय पाध्ये यांनी दिले. आगामी वर्षासाठी अंतर्गत लेखापरीक्षक म्हणून ए०जे० दिघे अँड कंपनी यांची तर कायदेशीर सल्लागार म्हणून अॅड० पराग देशपांडे यांची पुनर्नियुक्ती करण्याच्या ठरावाचे प्रा० आनंद काटीकर हे सूचक होते व अनुमोदक म्हणून श्री० चित्तरंजन भट होते.
कार्यक्रमपत्रिकेतील विषय संपल्यावर आयत्यावेळचे विषय घेण्यात आले. यामध्ये प्रा० मिलिंद मालशे यांनी, आजच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे लेखन काळजी वाटणारे असल्यामुळे 'लेखन कसे करावे?' या विषयावर एक कार्यशाळा आयोजित करावी, यामध्ये पत्रलेखन, पुस्तक परिचय-परीक्षण, टिपणलेखन इत्यादी विषयांचा समावेश असावा; अशी सूचना केली. श्री० अरविंद नवरे यांनी, टपालखर्च कमी करण्यासाठी निमंत्रणे 'मेघदूत' पोस्टकार्डावर पाठवावीत आणि विशेष कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सभासदांना आर्थिक मदतीचे आवाहन करावे, अशी सूचना केली. श्री० विजय पाध्ये यांनी संगणक आणि आंतरजालाचा अधिकाधिक वापर करून खर्च वाचवता येईल असा मार्ग सुचवला, त्याचप्रमाणे मराठीचा संगणकावर उपयोगी पडणारा शब्दार्थकोश बनवण्यासाठी रु० १०,०००/- ची देणगीही जाहीर केली. कार्यवाह डॉ० नीलिमा गुंडी यांनी आपली संस्था युवकांपर्यंत पोहोचावी यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न करावेत आणि उपायही सुचवावेत असे आवाहन केले. या दृष्टीने डॉ० कल्याण काळे यांनी आपला अंक जनसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना मांडली. डॉ० मिलिंद मालशे यांनी सर्व महाविद्यालयांतील मराठी विभागांमध्ये नमुना अंक आणि आवाहनपत्र पाठवून द्यावे अशी सूचना मांडली. श्री० चित्तरंजन भट यांनी आंतरजालावर युवक मोठ्या प्रमाणावर भाषेवर चर्चा करत असतात; आपल्या संकेतस्थळावर अशी चर्चा करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्यास अधिक युवक आकर्षित होऊ शकतील असे मत व्यक्त केले.
या सर्व चर्चेचा आणि सभेचा समारोप अध्यक्ष प्रा० प्र०ना० परांजपे यांनी केला. आपल्या मनोगतात ते म्हणाले, वयाच्या १२ व्या-१४ व्या वर्षी माणूस वाङ्मयाच्या प्रेमात पडतो, त्यानंतर ती आवड वाढत राहते, रुजते, कधीही नष्ट होत नाही. पण बदलत्या युगात ही आवड निर्माणच होत नाही. त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी साहित्य वाचावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मराठी अभ्यास परिषदेचे सभासदत्व नाममात्र शुल्कात विद्यार्थ्यांना देता येईल. 'भाषा आणि जीवन'चा अंक त्यांच्यापर्यंत पोहोचावा, अनेकांनी तो वाचावा यासाठी प्रयत्न व्हावेत. संस्थेचे सभासद वाढवणे, उपक्रम वाढवणे त्यात सहभागी होणार्यांची संख्या वाढवणे याकडे लक्ष द्यायला हवे. काही देणगीदार मिळवून काही महाविद्यालयांना अंक मोफत पाठवावा. टपालखात्याकडून काही सवलती मिळवण्याचे प्रयत्न करावे. तरुण कार्यकर्त्यांची फळी उभी राहावी यासाठी प्रयत्न करावेत. पैसा नाही ही समस्या नसून मनुष्यबळाचा अभाव ही समस्या आहे, याकडे गांभीर्यांने लक्ष द्यायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपाध्यक्ष डॉ० मृणालिनी शहा यांनी आभार मानल्यावर सभेचा समारोप झाला.
प्रा० आनंद काटीकर, पुणे