मराठीचे डोळे. इंग्रजीची खिडकी.
[परीक्षित पुस्तक : 'भाषाभान' - डॉ० नीलिमा गुंडी. उन्मेष प्रकाशन, पुणे. २००८. पृष्ठे १७२.
किंमत रु० १५०/-]
'भाषाभान' हा डॉ० नीलिमा गुंडी यांच्या भाषाविषयक तेहेतीस लेखांचा संग्रह आहे. लेखिकेने सोयीसाठी त्यांचे दोन भाग केले आहेत; पण त्या भागांना शीर्षके दिलेली नाहीत. ललित आणि वैचारिक अशा कप्पेबंद विभागणीत मावणारे असे हे लेख नाहीत, याची लेखिकेला जाणीव आहे. लेखांचा आशय आणि स्वरूप पाहता त्यातील लेखांची थोडीफार वर्गवारी करता येते. त्यात काही लेख भाषिक निरीक्षणांवर आधारित आहेत. मुलांची भाषा, नवतरुणांची भाषा, स्त्रियांची भाषा, मराठीवर हिंदी आणि इंग्रजीच्या रेट्याचा होणारा परिणाम, मराठीतील काही वाक्प्रचार, भाषेतील लेखनदोष असा साधारणपणे एक वर्ग मानता येईल. या स्वरूपाचे सर्वाधिक म्हणजे पंधरा लेख या संकलनात आहेत. मराठी भाषेची आजची स्थिती, तिच्या अध्यापनातील काही समस्या आणि त्यांची सोडवणूक, मराठी भाषेपुढील आव्हाने आणि त्यासाठी उपाययोजना अशा प्रकारच्या सात लेखांचा दुसरा एक गट या पुस्तकात आहे. 'बालसाहित्य, बालशिक्षण आणि मुलांची भाषा', व 'काव्यसमीक्षेची परिभाषा : काही निरीक्षणे' हे दोन लेख चर्चासत्रांमध्ये सादर केलेल्या निबंधांच्या स्वरूपाचे आहेत. काही साहित्यकृतींची भाषाशैली, काहींची शीर्षके, काहींमधील प्रतिमा, साहित्यातील श्रुतयोजने, यशवंतांच्या 'आई' कवितेचे संस्करण अशा सात लेखांचा यात समावेश आहे. पुस्तकाच्या शेवटी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक डॉ० अशोक केळकर आणि डॉ० बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ० नागनाथ कोत्तापल्ले यांच्या मुलाखती आहेत.
ही वर्गवारी देण्याचे कारण लेखसंग्रह संपादित करत असताना असे काही धोरण ठेवल्याचे आढळत नाही. लेखांना शीर्षके आहेत; परंतु अनुक्रमणिकेतही अंक नाहीत. त्यामुळे मुलांच्या भाषेविषयी पहिले पाच लेख झाल्यानंतर मध्येच खाणे, फुटणे या वाक्प्रचारांशी संबंधित दोन लेख येतात. पुन्हा 'एक दोन साडे माडे ऽ तीन' हा लेख येतो. 'स्त्रियांची भाषा' या विषयावर असलेले दोन लेख, 'भाषिक क्षमतांची निगराणी', 'वाचन एक भाषिक कौशल्य' हे दोन लेख आणि 'व्यक्ती आणि वल्ली: भाषाशैलीची वैशिष्ट्ये', 'अपूर्वाईमधील भाषेचे संवेदन' अशा चार लेखांच्या मध्ये येतात. वास्तविक मुलांची भाषा, स्त्रियांची भाषा, नवतरुणांची भाषा असा क्रम साधणे शक्य होते. मराठीवर होणारी आक्रमणे, अध्यापनातील अडचणी, भाषिक कौशल्यांविषयी उपाययोजना आणि मार्गदर्शन असा एक सुसंगत गट कप्पे न पाडता केवळ अनुक्रम साधून देता आला असता आणि त्यामुळे स्फुट लेखन जसजसे छापले गेले तसतसे यदृच्छया संकलित केले असे जे स्वरूप या लेखसंग्रहाला आले आहे तसे ते आले नसते. यातील प्रत्येक लेख स्वतंत्र असता तर गोष्ट वेगळी; अन्यथा त्यावर संपादकीय हात फिरवणे आवश्यक होते. असे न केल्यामुळे 'हवी '"शब्द जिरवा'' मोहीम' या लेखातील 'व्यस्त', 'ताजगी', 'प्रतियोगिता' ही हिंदीच्या आक्रमणाची उदाहरणे त्या पाठोपाठच्या 'मराठी: एका ऐतिहासिक वळणावर' याही लेखात आली आहेत. (मातृभाषा) सुसंस्कृत माणसाची ती जणू चौथी मूलभूत गरज असते' हे वाक्य सात आणि एकशे अडतीस पृष्ठांवर येते.
या सर्व लेखांमधून आढळणारी समान गोष्ट म्हणजे लेखिकेची मराठी भाषेवर असलेली प्रांजळ निष्ठा. गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेली :
श्री चावुण्डराजें करवियले
गंगराजें सुत्ताले करवियले
ही वाक्ये ( ती लेखात म्हटल्यानुसार एक नसून दोन आहेत) पाहून तिचे मन आनंदाने भरून येते. ती वाचताना भाषेच्या गंगोत्रीशी पोचल्याचा अलौकिक अनुभव तिला येतो. भाषेतील उच्चा रांना ती 'मंत्रशक्ती' असा शब्द वापरते. भाषाशुद्धीची मोहीम तिने उघडली नसली तरी व्यवहारातील वेगळी रूपे टिपण्याची संवेदनशीलता तिच्याजवळ आहे. आपल्या मुलीच्या भाषिक विकासाचा आलेख नोंदवून ठेवण्याइतकी ती जागरूक आहे. लेखिकेची अभ्यासू वृत्ती अनेक ठिकाणी पाहायला मिळते. 'मराठीत सरस रीतीने फकीकेत लिहिणारे हेच पहिले' या स०का० छत्र्यांविषयी दादोबा पांडुरंगांनी लिहिलेल्या वाक्यातील 'फकीकेत' शब्दाचा 'गद्य लेखनशैलीत' हा अर्थ तिने कोशातून मिळवला. नेलकटरसाठी मराठीत 'नर्हा'णी' हा शब्द आहे हा शोधही तिला एका कोशातच लागला. कवी यशवंतांनी आपल्या 'आई' या कवितेत केलेली संस्करणे कशी समर्थनीय आहेत. हे तिने दाखविले आहे. द०भा० धामणस्करांच्या 'दोन दरांच्या टोमॅटोज्पासून' या कवितेचा सामाजिक अन्वयार्थ लेखिकेने चांगला उलगडून दाखवला आहे. प्रदीर्घ काळ मराठीचे अध्यापन केल्यामुळे स्वाभाविकपणे आलेल्या बहुश्रुततेचा ('वेलरेड' असण्याचा) प्रत्यय या पुस्तकात अनेक कवितांमधून, अवतरणांमधून येत राहतो. त्या दृष्टीने 'श्रुतयोजन : भाषेचा वारसा' आणि 'लक्षवेधी शीर्षके' हे दोन लेख वाचनीय आहेत. 'भाषिक क्षमतांची निगराणी', 'वाचन : एक भाषिक कौशल्य' 'बालसाहित्य, बालशिक्षण आणि मुलांची भाषा' या लेखांमधून लेखिकेला वाटणारी कळकळ प्रतीत होते. ज्या दोन विद्वान भाषातज्ज्ञांच्या मुलाखती या संग्रहात समाविष्ट आहेत, त्यांना विचारलेल्या प्रश्र्नांमध्ये नेमकेपणा आहे. एकातून डॉ० केळकर यांनी विदग्ध आणि वैज्ञानिक साहित्याच्या केलेल्या वाटचालीचा आलेख मिळतो, तर दुसरीतून डॉ० कोत्तापल्ले यांच्या निर्भीड विचारंाचा प्रत्यय येतो.
असे असूनही भाषेविषयी काही मूलभूत, अपूर्व असे वाचल्याचे समाधान या पुस्तकातून मिळत नाही. याचे कारण बरेच लेख अतिशय त्रोटक आहेत. त्यांचा विस्तार, मांडणी तर्कशुद्ध रीतीने होत नाही. जाता जाता आठवले ते लिहिले असे काहींचे लेखन झाले आहे. उदा० 'काळ आणि भाषा : एक चकवा' हा लेख. ग्रीनिच वेळेपासून आरंभ होणारा हा लेख अवतरणांसह दोन पानांत संपून जातो. आपल्या घरच्या, आजूबाजूच्या व्यक्तींच्या उद्गारांतून, अनुभवांतून लेखिका काही संदर्भ देते. डॉ० इरावती कर्वे यांचे ललित लेख असे असत. पण लहान गौरीच्या (देशपंाडे) उद्गारांनी सुरू झालेला त्यांचा 'दिक्का ल' हा लेख किती मोठा पल्ला गाठतो! केवळ कल्पित वाटणारी म्हणून रसभंग करणारी उदाहरणे काही लेखांत सापडतात. 'अस्मानी' आणि 'सुलतानी' ही जुळ्या मुलींची नावे (१३) कोण ठेवेल? बारशाला आलेला छोटा मुलगा 'ओजस्वी' हे नाव ऐकताच 'नाव नाही विशेषण!' म्हणतो (१६) हे जरा अस्वाभाविकच वाटते. वा०म० जोशींच्या कादंबरीवरून काही (किती?) महत्त्वाच्या मराठी साहित्यिकांनी आपल्या पत्नीलचे नाव 'रागिणी' ठेवले. (१२) (विद्याधर पुंडलीक सोडल्यास अन्य कोणत्या?) 'साहित्य हे भाषेच्या संदर्भातील 'कळसूबाईचे' शिखरच ठरते (१७) (कोणत्या अर्थाने?) 'आंधळी कोशिंबीर', 'काकडी कोशिंबीर'सारखे खेळ (२२) यांतला दुसरा खेळ कोणता? 'भोज्या' हा शब्द भोग्यावरून आला आहे (२२) हे कसे? लेखिका म्हणते, भोग्या म्हणजे ज्याने पुष्कळ अनुभवले आहे असा. भोज्या अनेकांचे स्पर्श अनुभवतोच!' ही व्युत्पत्ती विश्वास बसू नये एवढी बादरायण आहे. भोग्य/भोग्या म्हणजे उपभोग घेण्याजोगा. लीळाचरित्रात याला 'भो करणे' (उत्त० ८५) असा शब्द वापरलेला आहे. प्रत्येक मराठी शब्दाचे मूळ संस्कृतातच शोधण्याची खटपट कशासाठी? सागरगोट्यांच्या खेळातील 'वरखई' या शब्दाचा खुलासा असाच अगम्य आहे. मुळात तो शब्द 'वख्खई' असा आहे. सात सागर-गोट्यांतला एक उंच फेकून तो झेलण्यापूर्वी प्रथम एकेक, नंतर दोन दोन असे करत शेवटी सर्व सहा सागरगोटे एका फेकेत गोळा करून वरचा झेलणे असा तो डाव असतो. हा डाव या क्रमाने पूर्ण केला की दुसर्यास भिडूवर वख्खई झाली असे म्हणतात - चूक झाल्यास वख्खई मोडली. सागरगोटे खेळताना वरून खाली टाकायचे (आणि मग पुढे काय करायचे?) असा खेळ पाहिल्याचे आठवत नाही.
एकदोन लेखांमध्ये औचित्यभंगाचा दोषही लक्षात येतो. लक्ष्मीबाई टिळकांच्या आत्मचरित्राचे 'गाजलेले' (५०) हे वर्णन अनुचित आहे. मराठीत 'सांगत्ये ऐका' हे आत्मचरित्र 'गाजले'. खुशवंतसिंग किंवा प्रतिमा बेदी यांची आत्मवृत्ते 'गाजतात'. अशा ठिकाणी शब्दांची निवड जपून करायला हवी. शब्दांप्रमाणे कल्पनेच्या बाबतीतसुद्धा हा अनुभव येतो. 'फुटणे'शी संबंधित वाक्प्रचारांचे संकलन करता करता नशीब फुटणे, बांगडी फुटणे हे अशुभसूचन आणि तांबडं फुटणे, अंकुर फुटणे हे निर्मितिदर्शक इतक्या दोन टोकाचे वाक्प्रचार आढळतात, हे लेखिकेचे निरीक्षण आहे. (३१). हा अनुभव लेखिकेला 'शुभा-शुभाचा फिटे किनारा' असा वाटतो. वास्तविक मर्ढेकरांनी
ह्या गंगेमधि गगन वितळले
शुभाशुभाचा फिटे किनारा
अशी केवढी भव्य आध्यात्मिकतेच्या उंचीला पोचणारी प्रतिमा कवितेच्या प्रारंभीच उभी केली होती. ती सामान्य वाक्प्रचारांसाठी वापरणे उचित वाटत नाही. नवतरुणांच्या भाषेचे पोरकट वाटणारे नमुने देऊन झाल्यावर (४१,४२) लेखिकेला एकदम 'ज्ञानेश्वरी'च्या बाराव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी भाषेवर केलेले रूपक आठवते. लेखिकेची ही तुलना रसभंग करणारी वाटते.
काही ठिकाणी लेखिकेने केलेली शब्दयोजना थोडी खटकते. स्त्रियांनी सक्षमीकरण वर्षात 'सशक्त' व्हावे हा हिंदी प्रभाव पाहून लेखिका म्हणते, ''समस्त स्त्रिया शरीराने कृश... त्यांना पौष्टिकाच्या उपायांची'' (४५) जरुरी आहे. येथे विशेषणाचे नाम बनविल्याने ही रचना सदोष झाली. 'माझी स्वप्नं चूर झाली' (४८) या वाक्यानंतर लेखिकेने स्वप्नांच्या चुरा होतो किंवा ती चक्का चूर होतात असे म्हटले आहे. हा हिंदी चकनाचूर किंवा चूरचूर या शब्दांचा प्रभाव आहे, ह्याची नोंद केली नाही. मुली लाजेने चूर व्हायच्या तिथे आता स्वप्ने चूर व्हायला लागली असे म्हणता आले असते. एके ठिकाणी 'त्याची व्यावहारिक जगण्याची पातळी' (५७) ही शब्दयोजना वास्तविक 'त्याच्या जगण्याची व्यावहारिक पातळी' अशी असायला हवी. 'दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे' या 'कुवलयमाला'मधील अवतरणात लेखिकेने 'दिले घेतले असे' (रोखठोकपणे) म्हणणारे, ही भर निष्कारण घातली आहे (५८). मुळात अनेक प्रांतांमधल्या लोकांचे वर्णन, वृत्तिविशेष आणि त्यांच्या भाषेचा नमुना अशी दोन दोन ओळींची ही रचना आहे. मरहट्ट्यांचे नेमके विशेष पहिल्या ओळीत आल्यानंतर (दढमडह सामलंघे सहिरे अहिमाण कलहसीले) पुन्हा स्वत:चा शब्द मध्ये घालण्याचे इथे कारण नव्हते. अवतरणांचा अर्थ नेमका असावा.
पुस्तकाच्या दुसर्या भागात 'वैचारिक' लेख आहेत. त्यांचे स्वरूप बरेचसे नैमित्तिक आहे. श्रुतयोजन, लक्षवेधी शीर्षके (कवितेच्या ओळींची), भाषाव्यवस्थेशी निगडित प्रतिमा हे लेख केवळ संकलनात्मक आहेत. प्रतिमांच्या लेखात लिपी, विरामचिन्हे, व्याकरण यांच्यावरून वापरलेल्या अनेक प्रतिमांची उदाहरणे दिली आहेत. पण र०कृ० जोशी यांच्या काव्यनिर्मितीचा उल्लेख त्यात नाही. 'भाषिक क्षमतांची निगराणी', 'वाचन : एक भाषिक कौशल्य', 'म मराठीचा' हे लेख केवळ भाषेविषयी आहेत म्हणून त्यांचा समावेश ललित लेखसंग्रहात केल्यामुळे संग्रहाच्या एकजिनसी स्वरूपाला धक्का पोचतो.
असे असूनही भाषेविषयीच्या निरीक्षणांसाठी 'भाषाभान' हा लेखसंग्रह वाचनीय आहे. मराठीचे किती अध्यापक केवळ भाषेविषयी अशा पोटतिडिकीने लिहितात? डॉ० नीलिमा गुंडी यांची मराठीविषयीची आस्था आणि अनुभव यांचे दर्शन या पुस्तकाद्वारे निश्चित होते.
F-४४, सुंदरनगरी, ३०८, सोमवार पेठ, पुणे ४११ ०११. दूरभाष : २६११ १११३